Friday, July 9, 2010

कवटीतला पांढरा स्वच्छ मोर

जाळण्याअगोदर एवढं करा

कवटीतला पांढरा स्वच्छ मोर आहे
त्याला सोडून द्या दूर जंगलात

बरगड्यांच्या पिंजर्यातला जो
जक्खड म्हातारा होर्नबील आहे
त्याला उडवून द्या अवकाशात

पोटात पचनक्रियेत सहाय्यक ब्याक्टेरीयाबरोबर
पाच अंधळ्या गोगलगाई आहेत
त्यांना सोडून द्या शेतात चरायला

आतड्यामध्ये राहणारी लालकाळी सुरवंत
व हिरव्यागार अळ्या आहेत
त्यांना सोडून द्या पाचोळ्यात
(पांढरी फुलपाखर होण्यासाठी)

ज्याला तुम्ही माझ्या इंद्रियाची नळी समजताय
ती खरतर दुर्बीण आहे
शर्मिष्ठा मधल्या नेबुलाला पाहण्यासाठी बनवलेली
(ती दान करा एखाद्या गरजू वेधशाळेला)

ज्याला तुम्ही गोटया समजताय
ती माझी जास्तीची बुबुळ आहेत
त्यांच्यावरच्या पापण्या अलगदपणे मिटायच विसरू नका

त्यांच्याखाली वेटोळे घालून बसलेला नाग आहे
तो आपण होऊन निघून जाईल
स्वताच्या वारुळात

डोळे दान करा
कोणत्याही सज्जन डोळस व्यक्तीला
म्हणजे नसलेल्या गोष्टीही
स्पष्ट दिसतील त्याला

देह दान करा
देह नसलेल्या गरजूला
आणि मग जे काही उरेल
ते सारख्या प्रमाणात वाटून टाका

माझ्या कविता कुरतडनार्या
चौर्यांशी लक्ष घुशिंमध्ये

सचिन केतकर (जरासंधाच्या ब्लोग्वारचे काही अंश)

No comments:

Post a Comment